मेनू बंद

श्रीदत्ताश्रमातर्फे प्रकाशित झालेले व सध्या उपलब्ध असलेले साहित्य व त्याचा थोडक्यात परिचय

  1. श्रीदत्तविचारशलाका – प पू श्रीदत्तमहाराजांनी प्रवचनाच्या माध्यमातून व्यक्त केलेले उपदेशपर विचार संक्षिप्त रुपाने या पुस्तकात वाचायला मिळातात़.
  2. आल्हादिनी भाग १ व २ – (प पू सौ ताईमहाराज चाटुपळे यांच्या भक्तांच्या अनुभवांचा संग्रह़) अनेक साधकांचे अनुभव या दोन्ही भागात एकत्र मांडले आहेत़. एकीकडे त्यांच्या दिव्य शक्तीचा अधिकार तर दुसरीकडे अनेकांना त्यांनी वेळोवेळी केलेले मार्गदर्शन, आयुष्यात कसे वागावे, ध्येय काय असावे याची साधकांना करुन दिलेली जाणीव या दोन्हींचा सुरेख संगम या पुस्तकातून घडला आहे़. त्यांच्या व्रतस्थ आणि निस्पृह जीवनाचा एक सुंदर आलेख यातून आपोआप उलगडला आहे़.
  3. प पू श्री दत्तमहाराज कवीश्वर यांचा पत्र संग्रह भाग १ व २ (प पू श्रीमहाराज व त्यांचे भक्त यांच्यातील पत्र व्यवहारावर आधारीत प्रकाशन) – यात पत्रांच्या माध्यमातून श्रीमहाराजांनी साधकांना मार्गदर्शन केले आहे़. प्रतिकूलतेवर ईश्वरभक्तीने मात करता येते, संसार देवाचा आहे, तो कर्तव्याला न चुकता करुन देवाच्या चरणी वाहून टाकावा, प्रयत्नवाद असावा, नामस्मरण, संतचरित्राचे वाचन, नियमित साधना करणं अशा विविधांगी आणि परमार्थ प्रवण करणा-या महत्वाच्या सूचना यात दिल्या आहेत़.
  4. पत्रसंग्रह २ मध्ये शेवटी सर्वसामान्य वाचकाला समजतील अशा त-हेने प्रश्न मांडून त्याची उत्तरे महाराजांच्या प्रवचनांतून घेतली आहेत़.
  5. व्दिसाहस्त्री श्रीगुरुचरित्र सटीक – मूळ प्राकृतातील श्रीगुरुचरित्रामध्ये सात हजार ओव्या आहेत़. प प श्रीमत् वासुदेवानंद सरस्वतीस्वामीमहाराजांनी श्रीदत्तात्रेयांच्या आज्ञेने हा कथाभाग दोन हजार श्लोकात संस्कृत भाषेत सांगितला असल्याने याला व्दिसाहस्त्री असे नांव दिले आहे़. मूळ श्रीगुरुचरित्रातील कथाभागाशिवाय श्रीस्वामीमहाराजांनी या ग्रंथातल्या श्लोकावर संस्कृत भाषेतच विवरण (ज्याला संस्कृत भाषेत टीका म्हणतात) लिहिले आहे़.
  6. श्री महाराजांनी मराठी भाषेत या ग्रंथावर आधारीत विवरणात एरव्ही सर्व सामान्यांना न समजणारे शास्त्रीय सिद्धांत, शास्त्रीय माहीती, त्याचे महत्व सोप्या भाषेत दिल्याने ते सामान्य वाचकभक्ताला शास्त्राचरण करण्यास उद्युक्त करते़.
  7. व्दिसाहस्त्री श्रीगुरुचरित्र – श्रीगुरुचरित्रातील कथांचा गूढार्थ ह्यातून सांगितला आहे़. दृढ, श्रद्धा, भक्ती, समर्पण कसे असते हे निरनिराळया कथांच्या माध्यमातून पुन्हा पुन्हा सांगितले आहे़. बुद्धि शुद्धता, कर्र्म शुद्धि, मनाची स्थिरता, सात्विक आहार ह्याचेही विवेचन या भागांतून केले आहे़.
  8. आनंदलहरी भाग १ते ८ – भगवंताचे अनेक गुण व त्याची शक्ती, त्या विषयीची भक्ती आपल्या मनामध्ये निर्माण व्हावी, दृढ व्हावी या विषयीचे चिंतन या सर्व भागातून आले आहे़. गायत्री मंत्र, दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा या महामंत्राचा अर्थ, अपराधक्षमापन स्तोत्र या सर्वांचे रहस्य व अर्थ उलगडून दाखवला आहे़. उपासनामार्ग, कर्म, ज्ञान, भक्ती, मोक्ष या विषयीचे सखोल चिंतन संतांच्या चरित्रातून, महाभारत, रामायणासारख्या ग्रंथातून वर्णन केलेल्या प्रसंगानुसार त्या त्या व्यक्तीचे दाखले देत केले आहे़. सद्गुणांचा विकास व अवगुणांचा त्याग हा या प्रवचनांतील एक हेतु पण ज्या साधकांना ज्ञानाच्या खोल समुद्रात सूर मारायचा असेल तर त्यांनी ही प्रवचने मूळातूनच वाचावी़.
  9. जिज्ञासापूर्ती भाग १ व २ – प्रपंच आणि परमार्थ साधताना जीवाची उडालेली तारांबळ, ईश्वरभक्ती, सद्गुरुंची शक्ती, साधनेतील व्यत्यय, आहार विहार या संदर्भातील कुतूहल आणि प्रश्न साधकांच्या मनांत असतात़. मनाचे पूर्ण समाधान करणारे विवेचन यांत आपणाला वाचायला मिळेल़.
  10. श्रीदेवी भागवत भाग २ व ३ – प पू श्रीमहाराजांची प्रस्तुत पुस्तकातली प्रवचने म्हणजे मूळ संस्कृत भाषेतील पारंपारिक श्रीदेवीभागवत या ग्रंथावर आधारीत नवरात्रीच्या निमित्ताने केलेले रसाळ आणि भावपूर्ण असे प्रगट चिंतन आहे़. श्रीदेवीभागवताची चौकट न सोडता त्यांनी साधकांच्या अध्यात्मिक जाणीवा विकसित व्हाव्या म्हणून निरनिराळे शास्त्रीय विचार मांडले आहेत़.
  11. प पू श्रीदत्तमहाराजांच्या गोष्टी – प पू श्रीमहाराजांच्या आठवणी गोष्टीरुपाने सांगितल्या आहेत़. विशेषत: लहान मुलांनी मनावर योग्य ते संस्कार घडवणारे हे पुस्तक आवर्जुन वाचावे़. महाराजांची व्यावहारिक दक्षता, अभ्यास, प्रयत्न, कष्ट करण्यावर दिलेला भर, ईश्वरस्मरण, उपासना याची विद्यार्थी जीवनांत असणारी आवश्यकता या सर्वांचा योग्य निवाडा महाराजांच्या जीवनांतील कांही प्रसंगावरुन होतो.
  12. कल्याणवचने – प पू श्रीमहाराजांच्या प्रवचनांतून घेतलेले संक्षिप्त विचार या पुस्तकात बोधवचनांच्या स्वरुपात मांडले आहेत़. हे त्यांचे ‘‘आत्मानुभवाचे बोल‘‘ आहेत़. रोज एक विचार मनांत ठेवून त्याचे चिंतन केले तर इह व पर दोन्हीकडचे कल्याण साधता येईल़.
  13. श्रीसुंदरदत्तचरितम् – प पू श्रीदत्तमहाराजांचे ओवीबद्ध चरित्र
  14. श्रीमत् भागवत – प पू श्रीदत्तमहाराजांचे मूळ ग्रंथावर रसाळ प्रासादिक भाषेत निरुपण़.